औरंगाबादेत मुलगी गेली पळुन, बापाची रेल्वे समोर आत्महत्या.

By | November 16, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – मुलीचे हात 19 नोव्हेंबर रोजी पिवळे होणार असताना त्यापूर्वीच मुलगी घरातून निघून गेल्यामुळे खचलेल्या पित्याने मालगाडीसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि. 13) रात्री आठ वाजता औरंगाबाद येथील संग्रामनगर उड्डाणपुलाच्या परिसरात घडली. संजय सांडूजी वाकेकर (45, रा. महुनगर, सातारा परिसर) असे या पित्याचे नाव आहे. संजय वाकेकर हे खासगी गाडीवर चालक आहेत. त्यांची पत्नी संगीता धुणीभांडी करून कुटुंबाचा चरितार्थ चालवत होते. त्यांना एक मुलगा व मुलगी आहे. मुलगा कंपनीत नोकरी करतो. मुलगी घरीच होती. मुलीचे नात्यातील एका मुलासोबत नुकतेच लग्न जमवले होते. लग्नाची तारीखही काढण्यात आली. या लग्नाची जोरदार तयारी घरात चालली होती. डीजे, मंगल कार्यालयापासून सगळ्या गोष्टींचे बुकिंग केले होते. त्यासाठी दीड लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च केला. सर्व कुटुंबासह नातेवाईक लग्नाच्या तयारी व्यस्त असताना मुलगी शनिवारी दुपारी 3 वाजता घरातून निघून गेली. या प्रकरणाची नोंद सातारा पोलीस ठाण्यात करण्यात आली. मुलीचा शोध घेण्यासाठी संजय वाकेकर यांनी परिसर पालथा घातला. मात्र, ती सापडली नाही. ऐनवेळी मुलीचे लग्न रद्द करावे लागेल, समाजात मोठी बदनामी होईल या भीतीने खचलेल्या संजय यांनी चिकलठाण्याकडून आलेल्या मालगाडी रेल्वेसमोर आत्महत्या केली. ते गाडीसमोर जात असताना परिसरातील नागरिकांनी आरडाओरड करुन त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी ऐकले नाही. रेल्वेच्या धडकेत गंभीर जखमी झाले. यानंतर सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत गोर्डे पाटील यांनी जवाहनगर ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील यांना माहिती कळवली. पोलिसांनी संजय यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. रविवारी सकाळी मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास अंमलदार सुदाम दाभाडे करत आहेत. संजय वाकेकर यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीत त्यांनी ‘प्रिय संगीता, मी हे जग सोडून जात आहे. आता मुलीला आता घरात घेऊ नका. मुलाचे लग्न व्यवस्थित करा. तुझी कायम आठवण राहील, असा मजूकर लिहिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.