शेतकऱ्यांनो घाबरू नका; पावसासंबंधी निसर्गाचे संकेत कसे ओळखायचे? पंजाबराव डख यांनी सांगितले काही इंडिकेटर.

By | October 16, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – बोधेगाव  : १९९० ते १९९५ पर्यंत निसर्ग चांगला होता. मुंबईला पाऊस झाला की, तीन दिवसांत आपल्याकडेही पावसाला सुरुवात होत असे. त्यावेळी शेतकरी धुळपेरणीस सुरूवात करायचे. परंतु १९९५ नंतर उद्योगधंदे वाढले, मोठी शहरे वसली यासाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाल्याने निसर्गाने रौद्र रूप धारण केले. परिणामी पाऊस रूसला अन् महाराष्ट्राकडे पावसाने पाठ फिरवली. मात्र सध्या पृथ्वीवरील तापमान वाढल्याने पावसाचे प्रमाण देखील वाढले असल्याचे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी सांगितले.
बोधेगाव (ता शेवगाव) येथील व्यंकटेश उद्योग समुहाच्या सुखायू तर्फे घेण्यात आलेल्या मोबाईल अॅपचे लोकार्पण व भव्य शेतकरी मेळाव्यात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी पंजाबराव डख यांनी यांनी शेतकऱ्यांना पावसाचे संकेत ओळखण्यासाठी काही खास निसर्गाचे इंडिकेटर सांगितले आहेत. ते सांगत असतात डख म्हणाले, मी काही कुठल्याही विद्यापीठात याचे शिक्षण घेतलेले नाही. मात्र १० ते १५ वर्षे एका एका बाबींवर सूक्ष्म अभ्यास केला. तेव्हा कुठे तुम्हाला हे ठामपणे सांगू शकतो. काळजी करू नका, १५ दिवस आधीच मी तुम्हांला पावसाची माहिती देत राहील अन् तुमचे नुकसान होऊ देणार नाही.
काय आहेत निसर्गाचे संकेत.
घरातील लाईट, बल्ब, ट्युब भोवती किडे, पाकुळ्या आल्यातर समजावे पुढील ७२ तासांत पाऊस पडणार आहे.
वारा बंद होणे, सरपटणारे प्राणी बिळातून बाहेर पडू लागले, गर्मी जास्त जाणवू लागली तर समजावे पाऊस पडणार आहे.
पावसाळ्यात दिवस मावळत असताना, पश्चिमेस सायंकाळच्या वेळेला आकाश लालसर, तांबडे दिसले तर जुने लोक बी पडलं असे म्हणायचे. अशावेळी ७२ तासांत पाऊस पडणार समजावे.
 
चिमण्यांनी घरासमोरील अंगणातील धुळमातीत आंघोळ केल्यास ७२ तासांत पाऊस पडणार समजावे.
हवेतून उडणाऱ्या विमानाचा आवाज आला तर पाऊस पडणार असल्याचे समजते. ऐरवी विमानाचा आवाज ऐकू येत नाही.
 
गावाच्या बाजूला ४ ते ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या गावातील काकडा आरती, भजन याचा आवाज ऐकू आला तर पाऊस पडतो.
सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात सकाळी आपण शेतात गेल्यास पाय ओले झाले, दव पडलेले असले व पत्र्यावरून अंगणात पाणी पडले तर त्यादिवशी पाऊस पडत नाही. ज्यादिवशी दव पडणार नाही त्यावेळी पाऊस होतो.
ज्यावर्षी गावरान आंबा जास्त पिकतो, आपण खुप रस खातो. त्यावर्षी दुष्काळ पडतो, असे समजावे.
मुंग्यांनी आपले वारूळ जास्त उंच तयार केले असेल तर त्यावर्षी पाऊस जास्त पडतो.
वावटळ, वाळुट सुटल्यावर ७२ तासांत पाऊस पडणार समजावे.
 हवेत उडणारे घोडे (किटक) ज्यावर्षी जास्त दिसतील त्यावर्षी ‘अतिवृष्टी’ होणार असे समजावे.
दमा असणाऱ्या व्यक्तींना त्रास जाणवू लागला तर पाऊस पडतो. कारण वातावरणात बाष्प जास्त होऊन ऑक्सीजन कमी होत असतो.
सूर्याभोवती ११ जुनला दुपारी १२ वाजता गोल रिंगण, खळे दिसले की दुष्काळ पडतो.
१५ मे ३० मे या कालावधीत ज्या गावात पाऊस पडतो, त्या गावात येणाऱ्या पावसाळ्यात जास्त पाऊस पडतो. मात्र या कालावधीत ज्या गावात पाऊस पडत नाही. त्या गावात येणाऱ्या पावसाळ्यात पाऊस लांबतो.

Leave a Reply

Your email address will not be published.