खान्देश मध्ये कापुसाला उच्चांकी भाव.

By | November 11, 2021
मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – जळगाव : या वर्षी कपाशीची लागवड आधीच कमी असताना त्यात अतिवृष्टीमुळे पिकाच्या झालेल्या नुकसानीमुळे उत्पादनही कमी आले आहे. यामुळे कापसाला चांगला भाव मिळण्याची शक्यता वास्तवात येण्याच्या मार्गावर आहे.

सध्या हंगामातील सर्वाधिक म्हणजे साडेआठ ते नऊ हजार रुपये प्रतिक्विंटल दरात कापसाची थेट खरेदी होत आहे. पुढील काळात हे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

खान्देशात जिनिंग प्रेसिंग कारखान्यांची चाके १०-१५ दिवसांत वेगाने फिरू लागली आहेत. यामुळे कापसाची थेट (खेडा) खरेदीही सुरू झाली आहे. ग्रामीण भागात कापूसवेचणी वेगात सुरू असल्याने मजुरांचा तुटवडा भासत आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला कापसाचे दर पाच हजार २०० रुपये, महिनाअखेर सहा हजार २०० रुपये झाले होते. ऑक्टोबरमध्ये दरात वाढ होऊन ते साडेसात हजारांवर पोहोचले. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यातील भडगाव, पाचोरा, चोपडा, जामनेर, धुळे जिल्ह्यातील शिरपूर, नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा, शहादा आदी भागांत कापसाची आठ हजार २५० रुपये प्रतिक्विंटलने थेट खरेदी झाली. हा या हंगामातील कापसाला थेट खरेदीत मिळालेला उच्चांकी दर आहे. सद्य:स्थितीत कापसाचे दर नऊ हजारांवर पोहोचले आहेत.

कापूस खरेदीसाठी मध्य प्रदेश, गुजरातमधील खरेदीदारांचे दलाल खान्देशात दाखल झाले आहेत. अंकलेश्वार-बऱ्हाणपूर महामार्गालगत म्हणजेच तळोदा, शहादा, शिरपूर, चोपडा, यावल भागांत कापसाला भाव अधिक मिळत आहे, कारण या भागातून मध्य प्रदेश, गुजरातमध्ये लवकर पोहोचणे शक्य आहे. अनेक शेतकरी दरवाढीच्या अपेक्षेने सध्या कापूसविक्री टाळत आहेत, कारण उत्पादन कमी आले आहे. खर्च अधिक आहे. नुकसान भरून निघण्यासाठी नफा अपेक्षित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.